रत्नागिरी - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. याचा परिणाम उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर वसुलीवर झाला आहे. वार्षिक ७७ कोटी ५१ लाखांचे उद्दीष्ट असताना सहा महिन्यात केवळ २० कोटी ८२ लाखांचा महसूल गोळा झाला आहे. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यात उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आरटीओ कार्यालयासमोर राहणार आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी आरटीओ कार्यालयाला ७७ कोटी ५१ लाखांचे उद्दीष्ट -
नवीन वाहने खरेदी, जुन्या वाहनांचे कर, परवाने, शासनाचे विविध कर या माध्यमातून आरटीओ कार्यालयात करोडो रुपयांचा महसुल जमा होतो. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी आरटीओ कार्यालयाला ७७ कोटी ५१ लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु नवे आर्थिक वर्ष सुरू होतानाच लॉकडाऊन झाल्याने त्याचा परिणाम आरटीओ कार्यालयाच्या महसुलावर झाला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत नवे वाहन खरेदी प्रक्रिया पुर्णतः बंद होती. तर कर भरण्याला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आरटीओ कार्यालयात कर जमा करण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांची संख्या घटली होती.
सहा महिन्यांत केवळ २० कोटी ८२ लाख महसूल जमा -
सहा महिन्यांच्या कालावधीत विविध शुल्कांच्या आधारे तीन कोटी ७२ लाख ६८ हजार ६२८ रुपये जमा झाले. २३ हजार ७४३ रुपये थेट कार्यालयात तर ऑनलाइनच्या माध्यमातून ३२ लाख ७५ हजार ६५५ पर्यावरण कर जमा झाला आहे. रोड सेफ्टी कर, नव्या वाहन खरेदीचा कर असा २० कोटी ८२ लाख ३४ हजार ८२५ रुपयांचा कर आरटीओ कार्यालयात जमा झाला आहे. सहा महिन्याच्या कालावधीत किमान ५० कोटींच्या आसपास कर जमा होणे अपेक्षित होते. परंतु लॉकडाऊनचा थेट परिणाम कर वसुलीवर झाला आहे.
हेही वाचा - दसऱ्याला वाहन खरेदी-विक्रीत वाढ; परिवहन कार्यालयाला मिळावा कोट्यवधींचा महसूल
नियमाचा भंग करणाऱ्या १०५ वाहन चालकांवर कारवाई -
गेल्या सहा महिन्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे वाहनांवरील कारवाईची प्रक्रिया काही प्रमाणात थंडावली होती. तरीही नियमाचा भंग करणाऱ्या १०५ वाहन चालकांना १४ लाख ५ हजार २१२ रुपयांचा दंड करण्यात आला असून त्यातील ७४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता कारवाईची मोहीम पुन्हा हाती घेतली जाणार आहे.
हेही वाचा - माझे कुटुंब माझी जबाबदारीमुळेच कोरोना रुग्णांच्या वाढीला अंकुश - महसूल राज्यमंत्री सत्तार