रत्नागिरी - देवरुख येथील विलास रहाटे यांनी केवळ 3 सेंमी चौरसात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळीतून साकारत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या विक्रमाची नोंद जगातील आठ संस्थांनी घेतली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू आहेत. विलासला लहानपणापासून रांगोळी रेखाटनाची आवड होती. महाविद्यालयिन स्तरावर रांगोळीच्या विविध स्पर्धातून सादरीकरण करत करत तो व्यक्तीचिंत्राकडे वळला. यातून पुढे त्याने राज्यस्तरापर्यत आपल्या रांगोळीला नावलौकिक मिळवून दिला. त्याने कोरोना काळात जनजागृतीपर संदेश रांगोळीतूनही रेखाटली.
5 ते 6 ग्राम रांगोळीचा वापर -
दरम्यान नुकताच विलास यांनी लहान रांगोळीचा विक्रम केला आहे. केवळ 3 सेंमी चौरसात त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी विलासला 42 मिनिटे 37 सेकंद वेळ लागला. यासाठी जेमतेम 5 ते 6 ग्राम रांगोळीचा वापर करावा लागला. गेले वर्षभर तो यासाठी त्याचा सर्व सुरु होता. गतवर्षी शिवजयंतीला रांगोळीतून हा विश्व विक्रम करण्याचं त्याचं स्वप्न होते, मात्र त्याचं हे स्वप्न यावर्षीच्या शिवजयंतीला पूर्ण झाले.
8 संस्थांनी घेतली नोंद
या विक्रमाची नोंद आशिया बुक, इंडिया बुक, आयईए बुक, इंक्रेडीबल बुक, चॅम्पियन बुक, एक्सलुझिव्ह बुक, वज्र्य बुक आणि इंडिया स्टार बुक अशा आठ संस्थांनी घेतली आहे. आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू असल्याचं विलास रहाटे यांनी सांगितले.