रत्नागिरी - शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे. शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. चार काय चाळीस नवीन मंत्री झाले तरी शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही. शिवसेनेचा मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकणारच, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीतील हातखंबा इथे तरुणांच्या लसीकरण कार्यक्रमात बोलत होते.
'जिल्हा नियोजन बैठक आणि राणेंचा दौरा हा केवळ योगायोग' -
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीची बैठक 24 ऑगस्ट रोजी आहे. त्याच दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, नारायण राणे यांचा दौरा आहे म्हणून रत्नागिरी जिल्हा नियोजनची बैठक लागली, असे अजिबात नाही. बैठक आणि राणेंचा दौरा हा केवळ योगायोग आहे.
नाव न घेता पडळकरांवर टीका -
बैलगाडा शर्यतीसंदर्भात आंदोलन करणाऱ्यांनी केंद्राकडेदेखील याबाबतची मागणी करावी. केंद्रात त्यांचे सरकार आहे. केंद्र सरकारनेदेखील याबाबत निर्णय घेतला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे म्हणून काहींकडून असे प्रकार होत असल्याची टीका यावेळी सामंत यांनी पडळकर यांचे नाव न घेता केली आहे. तसेच कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थितीवर अवलंबून आहे. याबाबत जिल्हाधिकारी त्यांचा अहवाल डिझास्टर मॅनेजमेंटला देतील. त्यानंतर टास्क फोर्स याबाबत निर्णय घेईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा, म्हणाले बाळासाहेबांचे आशीर्वाद डोक्यावर आहेत