रत्नागिरी : खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावताना 'मी लढणारा माणूस आहे, रडणारा नाही' असे म्हणत विरोधकांना इशारा दिला आहे. माझी कारकीर्द संघर्षाची आहे, त्यामुळे मी लढून उत्तर देईन असे खेडेकर यांनी म्हटले आहे.
मी पारदर्शकतेने कारभार केला - खेडेकर
खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी गेल्या चार वर्षांत नगरपालिकेत भ्रष्टाचार करीत अनेक नियमबाह्य कामे केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. खेडेकर यांना अपात्र ठरवून कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे नगर परिषदेतील गटनेते आणि नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तब्बल 15 प्रस्ताव दाखल केलेत. या आरोपांना खेडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला हे रणांगणात हरवू शकत नाहीत. याची कल्पना असल्याने असे केविलवाणे प्रयत्न विरोधकांकडून केले जात असल्याचे खेडेकर यांनी म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत मी नगरपालिकेचा कारभार पारदर्शकतेने केला आहे. नगरपालिकेचा कोणताही ठराव मी बदललेला नाही. केबिनमध्ये पक्षाचे कार्यक्रम होऊ नयेत असा कोणताही राजशिष्टाचार नसल्याचं खेडेकर यावेळी म्हणाले. आपल्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचेही खेडेकर यांनी म्हटले आहे.