रत्नागिरी - मटका-जुगार यासारखे अवैध धंदे चालविणाऱ्या काही गुंडांनी खेड येथील पत्रकारांना धमकी देत त्यांना मारहाण केली होती. त्यामुळे त्यांनी गुरूवारपासून खेड शहरातील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, प्रांताधिकारी अविश कुमार सोनोने आणि पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांनी ३ वेळा उपोषणकर्त्या पत्रकारांची भेट घेत उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र, जोपर्यंत पोलीस अधीक्षक स्वतः उपोषणस्थळी येऊन चर्चा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केले.
अवैध मटका जुगार अड्डे वाल्यांनी ३ जूनला खेडमधील एका वृत्तपत्राच्या कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून धुडगूस घालून खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी दुपारीच पोलीस स्थानकात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही. वृत्तपत्र कार्यालयात घुसून धमकी देणाऱ्या या गुंडांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली असती तर रात्री पत्रकारांना मारहाण घडली नसती. स्थानिक पोलीस प्रशासनाने घेतलेल्या संशयास्पद भूमिकेची सविस्तर माहिती आणि धमकी तसेच मारहाण प्रकरणाचा घटनाक्रम निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना कळविण्यात आला. मात्र, तब्बल १५ दिवस उलटूनही कोणतीही दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची खात्यांतर्गत चौकशी करून निलंबित करण्यात यावे आणि मारहाण करणाऱ्या गुंडांना मोक्कातंर्गत कारवाई करून तडीपार करावे, अशा मागण्या पत्रकारांनी केल्या आहेत.
पत्रकारांनी तालुक्यातील मटका आणि जुगार धंद्या विरोधात छेडलेल्या उपोषणाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन पत्रकारांना जाहीर पाठिंबा दिला. यामध्ये नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष बाबाजी जाधव, अजय बिरवटकर, भाजपचे शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष भूषण काणे, शिवसेना तालुकाप्रमुख राजा बेलोसे, आरपीआय अध्यक्ष रजनीकांत जाधव, नगरसेवक भूषण चिखले, अजय माने आणि राजेश संसारे यांचा समावेश आहे.
पत्रकारांच्या वतीने नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात प्रशासनाची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली नाही.