रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर समुद्र देखील खवळला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ८०८.५०, तर सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेले ५ दिवस जिल्ह्यात पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. सोसाट्याच्या वार्यासह धुंवाधार कोसळणार्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान आज सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. तर समुद्र देखील खवळला आहे. दोन दिवसांनंतर पौर्णिमा आहे. मात्र त्याअगोदरच लाटांचे तांडव समुद्रकिनारी पाहायला मिळत आहे. तर नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. दरम्यान २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दीड महिन्यांत पावसाची विक्रमी नोंद -
दीड महिन्यांत जिल्ह्यात पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. १ जून ते २० जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल २०४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये १ जून ते २० जुलै या कालावधीमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मंडणगडमध्ये २१४८, दापोलीमध्ये १७९१, खेडमध्ये २३१२, गुहागरमध्ये २२६४, चिपळूणमध्ये १७९५, संगमेश्वरमध्ये १९५९, रत्नागिरी तालुक्यामध्ये २३३४, लांजामध्ये १९५० आणि राजापूर तालुक्यामध्ये १८२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अद्याप जुलै महिन्याचे १० दिवस बाकी असून हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा - देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचे शुटिंग, नाना पटोलेंचा आरोप