रत्नागिरी - गेले 2 दिवस मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही आज पावसाची धुवांधार बरसात सुरूच आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा होताना पाहायला मिळत आहे. कालपासून सुरू झालेली पावसाची बॅटिंग आजही सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीही कमालीची वाढ झालेली आहे.
जिल्ह्यातील 4 नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. आज सकाळी 12 वाजता आलेल्या अहवालानुसार खेड तालुक्यातील जगबुडी नदीची इशारा पातळी 5 मीटर इतकी आहे, मात्र सध्याची जगबुडी नदीची पाणीपातळी 5.95 मीटर इतकी आहे. तर संगमेश्वरमधील शास्त्री नदीची इशारा पातळी 6.20 मीटर आहे, मात्र सध्या शास्त्री नदीची पाणीपातळी 6.50 मीटर इतकी आहे. तर लांजा तालुक्यातील काजळी नदीची इशारा पातळी 16.50 मीटर आहे, मात्र काजळी नदीची सध्याची पाणीपातळी 17.340 मीटर इतकी आहे. तर राजापूर तालुक्यातील कोदवली नदीची इशारा पातळी 4.90 मीटर आहे, मात्र सध्याची कोदवली नदीची पाणीपातळी 5.70 मीटर एवढी आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर या नद्या धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 157 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात सर्वाधिक 342 मिमी, मंडणगडमध्ये 205 मिमी, संगमेश्वरमध्ये 210 मिमी, चिपळूणमध्ये 169 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट आजही वाहतुकीसाठी बंदच
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कालपासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आजही वाहतूक बंदच आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक काल संध्याकाळपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून चिरणी- कळंबस्ते मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.