रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दरम्यान रात्री पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नद्यांच्या पुराचे पाणी शिरले. माखजन बाजारपेठेतही पुन्हा एकदा पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी पूर ओसरला असला, तरी पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील कोदवली, वाशिष्ठी, जगबुडी, काजळी या नद्या दुथडीभरून वाहत आहेत. दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 130.26 मि.मी. तर एकूण 1172.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये तब्बल 215.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली 94.30 मि.मी., खेड 46.50, गुहागर 135.60 मि.मी., चिपळूण 102.50 मि.मी., संगमेश्वर 145.00 मि.मी., रत्नागिरी 162.90 मि.मी., राजापूर 128.70 मि.मी., लांजा 141.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.