रत्नागिरी- उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरूच असून, नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. तर चिपळूण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. काही ठिकाणी 2 ते 3 फूट पाणी साचले आहे. तर खेड बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरले आहे.
चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. पाणी कमी होण्याची चिन्ह नाहीत. चिपळूण शहरातील बाजारपेठ, भेंडी नाका, प्रभातगल्ली, नाईक कंपनी, खाटीक आळी, चिंचनाका, आईस फॅक्टरी, पोस्ट ऑफिस, वडनाका आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत वाढच होत आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे. बाजारपेठेतील व्यापाऱयांनी सायंकाळपासूनच आपला माल अन्यत्र ठेवायला सुरुवात केली होती. मात्र तरीही काही ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खेड बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरले आहे. खेड शहरातील सफा मज्जीद चौकात तीन फुटापर्यंत पाणी आहे. वाशिष्ठी आणि जगबुडी पूल वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे.
चिपळूण येथील कराड ते खेर्डी रोड,ओमेगा हाँटेल ते बहादूरशेक नाका पाण्याखाली गेला आहे .सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे सहा तासानंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.