रत्नागिरी - मागील दोन दिवसांपासून दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाने झोडपले. त्यानंतर उत्तर रत्नागिरीतही पावसाच्या सरी कोसळल्या. खेड, दापोली, मंडणगडमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे परिसरातील नद्यांच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या वरुणराजा चांगलाच बरसत आहे. कधी उत्तर तर कधी दक्षिण रत्नागिरीला पाऊस चांगलाच झोडत आहे. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड भागात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे या भागातल्या नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. रत्नागिरीमध्ये 24 तासामध्ये 112 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गुहागरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गुहागरमध्ये 250 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल दापोलीमध्ये 151 मिमी, चिपळूण 148, राजापूर 132, खेडमध्ये 114 तर मंडणगडमध्ये 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आगामी काही तासात पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.