रत्नागिरी - जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागरला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वशिष्टी आणि खेडमधील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाजारपुल आणि पालशेत येथील बाजारपेठे जवळील पूल पाण्याखाली गेला आहे. तर मुसळधार पावसाने गुहागरमधील पालशेत बाजारपेठेत नदीचे पाणी घुसले आहे.
मुसळधार पावसाने खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड शहरात पाणी शिरू लागले आहे. जगबुडी नदीलगत असणाऱ्या खेडमधील मटण-मच्छी मार्केटचा संपर्क तुटला असून मार्केट लगतच्या सहा ते सात दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. नदीलगतचा रस्तादेखील पाण्याखाली गेला आहे.
नारंगी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. त्यामुळे खेड ते सुसेरी मार्ग पाण्याखाली गेला असून चिंचघर, सुसेरी, खारी परिसरातील हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून कोणीही नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
नारगोळी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
मुसळधार पावसाने दापोली तालुक्यातील नारगोळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी चक्क पुलावरून वाहत असल्याने दापोली-गावातले, उन्हवरे, साखरोली रस्ता बंद झाले असून सुमारे ३० गावांचा संपर्क तुटला आहे. दुपारपासून रस्ता बंद असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे.