रत्नागिरी - जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी इमारतींची पडझड झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असलेले पहायला मिळत आहेत.
जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील कलझोंडी धरण 100% भरले आहे. पाऊस सतत सुरू असल्याने धरणाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी वरवडे-कलझोंडी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे तीन वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
रस्त्यावर जवळपास 3 ते 4 फूट पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे. पावसाने परीसरात अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे.