रात्नागिरी - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा प्रशासनची चिंता वाढवत होती. मात्र, प्रशासन आणि नागरिकांनी सरकारी नियमांचे पालन केल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला असून शेवटच्या रुग्णाला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय.
नागरिकांनी शिस्तीचे पाल केल्याने यश मिळाल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले. कोरोना मुक्तीच्या या लढ्याला सर्व सहभागी यंत्रणा, प्रशासन, पोलीस दल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी , ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचे अधिकारी व सर्व पदाधिकारी यांनी कोरोना मुक्तीसाठी परिश्रम घेतले. या वॉरियर्सचा मोलाचा वाटा असल्याचे परब यांनी व्हिडिओ संदेशमध्ये म्हटले आहे.
मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व यंत्रणेने केलेली कामगिरी मोलाची आहे. या सर्व काळात प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी सूचना देऊन तसेच या संदर्भातील बातम्यांना व्यवस्थित प्रसिद्धी देऊन सहकार्य केल्याबद्दल पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
नागरिकांनी पुन्हा सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून लोकांनी जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पुढील १४ दिवस एकही रुग्ण न सापडल्यास जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोन मध्ये होणार आहे.