रत्नागिरी - भाजप नेते गणेश नाईक यांनी डॉनशी असलेल्या संबंधांबाबत केलेल्या विधानानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं, याबाबत विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विचारलेल्या प्रश्नावर पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, सुप्रिया सुळेंनाच विचारलं पाहिजे, तुमचे कोणकोणत्या डॉनशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एन. के. सूळ नावाचे रॉचे एक निवृत्त अधिकारी आहेत, त्यांची यूट्यूब वर एक मुलाखत आहे. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्याविषयी काय काय खुलासे केलेत, त्याचं उत्तर आधी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं असं म्हणत पडळकर यांनी थेट पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे.
...तर एन. के. सूळ यांच्यावर कारवाई करा
दरम्यान पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, गणेश नाईक काय बोलले हे मला माहित नाही, मी त्यांना पुन्हा विचारेन, पण त्या अगोदर सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहावं, एन. के. सूळ नावाच्या एक्स रॉ ऑफिसरची एक मुलाखत आहे, ती मुलाखत आधी तपासा, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या बाबांवर गंभीर आरोप केलेले आहेत, जर ते आरोप खरे असतील तर बाबांवर कारवाई करा, जर ते आरोप खोटे असतील तर एन. के. सूळ यांच्यावर कारवाई करा, अशा मागणीचे पत्र सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांना लिहावे असे म्हणत पडळकर यांनी सुळेंवर निशाणा साधला आहे.