रत्नागिरी - जिल्ह्यातील गणपतीपुळे मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुले झाले आहे. शासनाच्या अटी व शर्थीप्रमाणे भाविकांना श्रींचे दर्शन सुरू करण्यात आले. पहाटे 5 पासून या ठिकाणी भाविकांना दर्शन सुरू झाले आहे. प्रत्येकाची प्राथमिक तपासणी करूनच आतमध्ये सोडले जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक असून दर्शनच्या रांगेत 5 फुटाचे अंतर देखील ठेवण्यात येत आहे.
राज्यभरातून या ठिकाणी भाविक दाखल झालेत. त्यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या ठिकाणी असणारं व्हिआयपी दर्शन बंद असणार आहे. येणाऱ्या प्रत्येकानं काळजी व खबरदारी घ्यावी, असं आवाहन सध्या मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
स्थानिक ग्रामस्थांना पहाटे 5.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत दर्शन-
आजपासून श्रींच्या दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थांना पहाटे 5.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत दर्शन मिळणार आहे. ग्रामस्थ आणि बाहेरून येणारे भाविक यांचा संपर्क होवू नये, म्हणून गणपतीपुळे मंदिर देवस्थानने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन मिळणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मंदिराच्या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. त्यानंतर मंदिर पुन्हा दर्शनासाठी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले रहाणार आहे.
आजारी व्यक्तींनी मंदिरात येऊ नये -
मंदिरात येताना दुर्वा, फुले, ओले साहित्य न आणता नारळ, सुकामेवा हा प्रसाद बंद पिशवीमध्ये पॅक करुन आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. श्रींच्या मंदिरामध्ये पूजा, अभिषेक कोणत्याही प्रकारे होणार नाही. मंदिरात येताना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सुरक्षित अंतर ठेवून दर्शनासाठी लाईन लावण्यात येणार आहे. 10 वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, दीर्घकालीन आजारी व्यक्तींनी मंदिरात येऊ नये, असे आवाहन देवस्थान पंच कमिटीमार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा- विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरुवात; चेन्नईतील भक्तांना मिळाला सर्वप्रथम दर्शनाचा मान
हेही वाचा- दिवाळी पाडव्याला होणार विठूरायाचे मुखदर्शन; दररोज एक हजार भाविकांना लाभ