रत्नागिरी - हापूस आंब्याच्या पाच पेट्या अहमदाबादला रवाना झाल्या आहेत. रत्नागिरी जवळच्या गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत बाबू शिंदे यांनी या मोसमातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या अहमदाबाद मार्केटला पाठवल्या असून पहिला आंबा पेट्या पाठवण्याचा मान मिळवला आहे. सलग सहा वर्षे पहिल्या आंबा पेट्या अहमदाबादला पाठवण्याचा मान शिंदेना मिळाला आहे. या आंब्याच्या पेटीला काय दर मिळतो याकडे सर्वांचा लक्ष्य लागले आहे.
पहिली पेटी पाठवण्याची परंपरा यावर्षीही कायम
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील शशिकांत बाबू शिंदे हे वयोवृद्ध आंबा बागायतदार गेले अनेक वर्ष आंबा व्यवसाय करत आहेत. आंबा झाडांची अगदी मुलांप्रमाणे ते काळजी घेतात. आंबा बागेची योग्य जोपासना, फवारणी बागेत साफसफाई करणे याकडे प्रामुख्याने ते लक्ष देतात. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर असलेली बाग तिला मिळालेले पोषक वातावरणामुळे गेली पाच वर्षे डिसेंबर-जानेवारी दरम्यान पहिली पेटी पाठवण्याची परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे. यावर्षी त्यांनी आंब्याच्या पहिल्या पाच पेट्या अहमदाबादला पाठवल्या आहेत.
येत्या काही दिवसांत आणखी पेट्या पाठवणार
याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, चार डझन, पाच डझन व सहा डझन, अशा पाच पेट्या अहमदाबाद मार्केटला रवाना करण्यात आल्या. त्यामुळे यापुढील पेट्या येत्या काही दिवसांत पाठवल्या जातील, त्यादृष्टीने आंबा काढणी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.
हेही वाचा - नारायण राणेंवर टीका करण्याइतकी भास्कर जाधवांची लायकी नाही- निलेश राणे