रत्नागिरी - उद्यापासून मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. मात्र यंदा नव्या मस्त्य हंगामावर महामारीचे सावट कायम आहे. 1 जून ते 31 जुलै दरम्यान समुद्रातील मासेमारीला बंदी असते. त्यानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू होतो. मात्र कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका यंदाच्या हंगामाला अगदी पहिल्या दिवसापासून बसण्याची शक्यता आहे. परराज्यातून येणार्या खलाशांची उपलब्धतता, व्यावसायासाठी आर्थिक चणचण, डिझेल परतावा रखडल्याने कर्जाचे थकलेले हप्ते या परिस्थितीत व्यावसाय सुरू करण्याची मानसिकता मच्छीमारांमध्ये नाही. तरीही स्थानिक खलाशांच्या सहाय्याने वातावरणाचा अंदाज घेत 30 टक्के मच्छीमार समुद्रात जाऊ शकणार आहेत.
गतवर्षीचा मासेमारी हंगाम अडचणीत सापडला होता. यंदा वादळे, त्यात लॉकडाऊन यामुळे मत्स्य व्यवसायही पुरता कोलमडला आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आताही लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मच्छिमारांना कामगारांची कमतरता आहे. जिल्ह्यात कर्नाटक, नेपाळ, केरळ येथून खलाशी आणण्यात येतात. लॉकडाऊनमुळे त्यांना आणण्यात अडचणी आहेत. त्यामुळे मोजक्याच मच्छीमारांनी खलाशी आणून त्यांना क्वारंटाइन केले होते. त्यामुळे 1 ऑगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी 30 टक्केच नौका सज्ज आहेत.
त्यात नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज मच्छिमारांना भासत आहे. एकीकडे मच्छीमार अशा नैसर्गिक संकटात सापडला असतानाच डिझेल दर वाढीने कंबरडे मोडणार आहे. मागील चार महिंन्यात साधारण 18 ते 20 रुपये डिझेल भाववाढ झाली आहे. याचा आर्थिक मेळ बसवताना कसरत करावी लागेल.
त्यामुळे सद्यस्थितीत वातावरण स्थिरावले तर ज्या बोटी सज्ज आहेत, त्यांना समुद्रात जाण्यास संधी मिळू शकते. त्यामुळे ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट व इतर लहान-मोठ्या बोटींद्वारे मासेमारी सुरू होण्याची शक्यता आहे. एकूणच मासेमारी हंगामावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.