रत्नागिरी - करंबवणे, आयनी, भिले-केतकी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारपासून नदी काठालगत मृत माशांचा खच दिसत आहेत. लोटे येथील कारखान्यांचे प्रदूषित पाणी दाभोळच्या खाडीमध्ये सोडल्यामुळे मासे मेल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जल प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रीत दूषित पाणी दाभोळ खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे दाभोळ खाडीतील लाखो मासे दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. मागील दोन दिवसांपासून, करंबवणे, भिले-केतकी, आयनी परिसरात दाभोळ खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून येत आहेत. दरम्यान, या प्रकाराची माहिती सीईटीपी (सांडपाणी प्रक्रिया) व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा - कोकणात आजही जपली जातेय वाघबारसची प्रथा
लोटे औद्योगीक वसाहतीतील रसायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात आला आहे. ज्या वेळी खाडीत मासे मोठया प्रमाणात येतात, त्याचवेळी हे दूषित पाणी खाडीत सोडले जाते. मासे मृत होण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न मच्छिमारांसमोर उभा आहे.
दरम्यान, सीईटीपी व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रदूषित पाणी दाभोळ खाडीमध्ये सोडणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.