रत्नागिरी - गणरायाच्या आगमनाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मूर्ती शाळांमधील लगबग वाढली आहे. मातीकाम जवळपास पूर्ण झाले असून आता रंगकाम आणि रेखणीच्या कामांना वेग आला आहे. रत्नागिरीतील रमेश बेलवलकर हे व्यवसायाने सोनार आहेत. परंतू मूर्तींना रेखणी कारणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
गणेशोत्सवाच्या चार ते पाच दिवस अगोदर रेखणीची कामे सुरु होतात. गणरायाची रंगरंगोटी किंवा मुर्तीचं कुठलेही काम भराभरा होते. मात्र, डोळ्यांची अदाकारीसाठी रेखणीच्या कालाकारांना विशेष कष्ट घ्यावे लागतात. गेली २५ वर्ष बेलवलकर गणपतीचे डोळे साकारत आहेत. एका दिवसात अनेक गणपतींची रुपे डोळ्यांच्या माध्यमातून ते जिवंत करतात. रेखणीचे काम करताना संयम आणि एकाग्रता महत्त्वाची असल्याचे बेलवलकर सांगतात.
तर, मूर्ती रेखणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून पारंपरिक गणरायाच्या मूर्तींना मागणी जास्त असल्याचे रत्नागिरीतील मूर्तिकार विजयानंद पालकर म्हणतात. सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या 'विठू माऊली' या मालिकेमुळे विठुरायाच्या रुपातील गणेशमूर्तीचीही भाविकांकडून यावर्षी मागणी झाल्याचे पालकर सांगतात.