रत्नागिरी - जिल्ह्याच्या काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री गुहागरमध्ये पावसाने शिडकावा केला होता. त्यानंतर आज (गुरुवार) संगमेश्वरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यात मागील दोन दिवस ढगाळ वातावरण होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला. संगमेश्वरमध्येही पाऊस चांगलाच बरसला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
अनेक भागात तुरळक पावसाच्या सरी-
अनेक भागात मध्यम तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. हवेतील आर्द्रता देखील वाढली होती. गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्यानंतर आणखी उकाडा वाढला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. रत्नागिरीमध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.