रत्नागिरी - प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी चांगले काम करण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. हा सन्मान निधी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं मिशन रत्नागिरीत सुरू झाले आहे. या पात्र लाभार्थ्यांची माहिती 30 जूनपुर्वी देण्याचे काम पूर्ण होईल, अशी खात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी निकष बदलण्यात आले. आणि क्षेत्र मर्यादा हटवून नव्याने नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी येथील अल्पबचत भवन येथे तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याच प्रकारचे प्रशिक्षण आज देवरुख येथे पार पडले. उद्या लांजा आणि राजापूरात हे प्रशिक्षण होणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ किमान वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यांच्या त्या कष्टासाठीच या निधीला 'किसान सन्मान निधी' नाव देण्यात आले आहे. या निमित्ताने शेतकरी वर्गाचा सन्मान करण्याची संधी आपणा सर्वांना लाभली आहे. या भूमिकेतून सकारात्मक पध्दतीने सर्वांनी यात योगदान देवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.
या आधी पहिला टप्प्यात योजना सुरु झाली. त्यावेळी फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील 16 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना हा सन्मान निधी देण्यात आला आहे. आता यातील 2 हेक्टरची क्षेत्रमर्यादा हटविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने लाभार्थ्यांची संख्या 8 लाखांहून अधिक असेल, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. सोबतच इतक्या सर्व जणांची माहिती 30 जूनपूर्वी गोळा करुन डाटा एन्ट्री करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मदतीने माहिती गोळा करुन विहित मुदतीत सादर करणे शक्य आहे, असे मत यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केले. या प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, तहसिलदार श्री. जाधव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची उपस्थिती होती.