रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये चढ उतार पहायाला मिळत आहेत. अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने करोडो रूपयांच्या उलाढालींवर परिणाम झाला आहे. या साऱ्या गोष्टी रत्नागिरीत देखील घडत असल्या तरिही जिल्ह्यातीलच स्वयंसहाय्यता समूह गट अर्थात महिला बचत गटांनी या कोरोनाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत लाखोंची उलाढाल केली आहे. मास्क निर्मितीमध्ये रत्नागिरी जिल्हा हा सध्या राज्यात अव्वल ठरला आहे.
हेही वाचा... जयंतीदिनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार नसलेला पाहून गहिवरली महिला
जिल्ह्यातील विविध बचत गटांनी तब्बल 1 लाख 17 हजार 458 मास्कची निर्मीती केली आहे. यामधून जवळपास 22 ते 25 लाखांची उलाढाल झाली असून हा आकडा आणखी वाढणार आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील बचत गटांनी 76,401 मास्कची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात 14 हजार बचत गट असले तरी मास्क निर्मितीमध्ये 100 बचत गटाच्या 900 ते 1000 महिला उमेद अभियानातंर्गत काम करत आहेत. मास्क तयार करताना सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच मास्क तयार केले जात आहेत. राज्य आणि केंद्र शासनाच्या उमेद अभिनातंर्गत बचत गटांच्या माध्यमातून सध्या मास्क तयार केले आहेत.
बचत गटांनी तयार केलेले मास्क सर्व शासकीय कार्यालये, जिल्ह्यातील मेडिकल्स आणि ग्रामपंचायतींमध्ये पुरवले जातात. 15 रूपये, 20 रूपये आणि 25 रूपये प्रति मास्क या दराने हे मास्क विकले जात आहेत. सध्या बाजारात मास्कची मागणी वाढत असून यातून पुढील काळात आणखी उलाढाल देखील होणार आहे. या साऱ्या बाबी काहीही असल्या तरी आम्ही कोरोनाच्या लढाईत समजाभान जपत आमचे कर्तव्य बजावत असल्याची प्रतिक्रिया बचत गटाच्या महिला देत आहेत.