रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते टोकूर दरम्यान विद्युतीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. उपकेंद्रांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात कोकण रेल्वे मार्गावरच्या विद्युतीकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे.
विद्युतीकरणाच्या या कामासाठी सुमारे 1 हजार 100 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 456 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कोकण रेल्वेमार्गाची टोकूर ते वेरना आणि वेरना ते रोहा अशी दोन टप्पात विभागणी केली गेली आहे. पहिल्या टप्प्यातील 200 किलोमीटरच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. रोहा ते रत्नागिरी विद्युतीकरणाचे काम 75 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्राचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
कोकण रेल्वेला इंधनासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठी विद्युतीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. यासाठी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिवी याठिकाणी ट्रॅक्शन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी या चार उपकेंद्रांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात रोहा ते रत्नागिरीदरम्यान विद्युतीकरणावर गाड्या सुरू करण्यासाठी चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करून पुन्हा अंतिम चाचणी घेतली जाणार आहे.
रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या 738 किलोमीटर लांबीच्या मार्गावर सर्व गाड्या मे, 2021पर्यंत विद्युतीकरणावर सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. विद्युतीकरणामुळे इंधनाचा वापर तर कमी होईलच, शिवाय रेल्वेगाड्यांची संख्या व वेग वाढवता येईल आणि नव्या गाड्यासुद्धा सुरू करता येतील. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची वर्षाला 100 कोटीची इंधन बचत होणार आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत या महिन्यात कोरोनाचे तब्बल 3250 रुग्ण वाढले, तर 115 जणांचा मृत्यू