रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी थंड झाली. दरम्यान जिल्ह्यात महायुती तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडूनही शक्तिप्रदर्शन करण्यात आले. काही ठिकाणी बाईक रॅली, तर काही ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. रत्नागिरीत पाचही जागा शिवसेना लढवत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आज प्रचार संपण्याआधी शिवसेनेकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन कऱण्यात आले. शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात उदय सामंत यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. पाचही जागांवर शिवसेनेचा विजय नक्कीच होईल, असे सांगत उदय सामंत यांनी आज प्रचाराची अखेरच्या टप्प्यात राळ उडवली. दरम्यान प्रचारासाठी जरी कमी दिवस मिळाले असले, तरी आमच्यासाठी ते पुरेसे होते, सुरुवातीपासूनच आम्ही जनतेच्या संपर्कात असतो, त्यामुळे प्रचार चांगला झालेला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयात कोणतीच अडचण येणार नाही असे सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान 21 तारखेला सर्वच मतदारांनी घराबाहेर आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही यावेळी उदय सामंत यांनी केले.
दरम्यान चिपळूण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम तसेच रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली.