रत्नागिरी - जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या 'माझी रत्नागिरी माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 24 हजार 71 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून, यातून नव्याने 85 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील 24 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
1 हजार 133 पथकांच्या माध्यमातून तपासणी मोहिम
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 710 पथकांनी तपास कामाला सुरुवात केली होती. आता सध्या 1 हजार 133 पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या अंतर्गत 35 हजार 338 घरांना भेटी देण्यात आल्या. यातून एकूण 43 हजार 902 कुटुंबातील 1 लाख 24 हजार 71 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान 4 हजार 889 घरे बंद असल्याचे आढळून आले आहे. तसेच ज्यांची ऑक्सिजन पातळी चालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली, अशांची एकूण संख्या शंभर इतकी आढळली आहे. तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 329 इतकी होती.
हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रक आणि कारमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू