रत्नागिरी - मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सल्ला दिला होता हे मला माहीत नाही. परंतु, एखादे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यावर न्यायालयाने दिलेला हा निर्णय आहे. ज्यावेळी महानगर पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली, त्यावेळी आम्ही कोर्टात गेलो नव्हतो. (Dussehra gathering of Shiv Sena ) समोरची लोक कोर्टात गेली होती. त्याच्यानंतर सदा सरवनकर यांनी मध्यस्थी याचिका दाखल केली होती. त्यावर तो कोर्टाचा निकाल आलेला आहे असं उदय सामंत म्हणाले आहेत.
नैसर्गिक युती - सध्या सहानुभूतीचं राजकारण करण्यापेक्षा किंवा सहानुभूती मिळत आहे. परंतु, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा विचार शिवतीर्थावरून काय जायचा, तर काँग्रेस आणि तत्सम जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आघाडी कधी करायची नाही, जो नैसर्गिक युतीचा पक्ष आहे त्याच्याबरोबर युती करून राजकारण करायचे हाच विचार शिवाजी पार्कवरून बाळासाहेबांनी दिला आहे. तो विचार पाठीमागे पडत चालल्यामुळे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार आणि आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे नेण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामुळे तो देखील मेळावा बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा मेळावा होत आहे असही ते म्हणाले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातला शिवसेनेचा सर्वात मोठा मेळावा वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेचा असणार आहे असही उदय सामंत म्हणाले आहेत.
हे समीकरण घट्ट झाले आहे - मनसेमधील तरुण कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की राज साहेबांनी दसरा मेळावा घ्यावा, त्यावर मी राज ठाकरेंना कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवली. यावर त्यांनी फार छान उत्तर दिले होते की, वर्षानुवर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट झाले आहे. आपण त्यात जाणे हे कोतेपणाचे आहे. हे समीकरण तसेच राहिले पाहिजे. त्यामुळे मी दसरा मेळावा घेण्यास उत्सुक नाही असे राज ठाकरेंनी सांगितल्याची माहिती प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना यांनी दिली होती.
राज ठाकरेंची बाळासाहेबांविषयी श्रद्धा - राज ठाकरेंनी आपल्या दौऱ्यात बोलताना एकनाथ शिंदेंना सांगितले होते, की दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कवर राजकारण करु नये, ते कोतेपणाचे लक्षण दिसेल, राज ठाकरेंचा सल्ला किती योग्य होता, हे आता ध्यानात आले असेल. राज ठाकरेंची बाळासाहेबांविषयी श्रद्धा यातून दिसते, असंही प्रकाश महाजन म्हणाले होते.