रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. काल रात्रभर पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू होती. त्यामुळे काही सखल भागात पाणी देखील साचले आहे. मात्र आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.
रेड अलर्ट
हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी हा रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरताना पहायला मिळत आहे. काल संध्याकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे.
अनेक ठिकाणी साचले पाणी
दरम्यान मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आला असून, चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले होते. तसेच रत्नागिरी शहरातही अनेक सखल भागात रात्रीच पाणी साचले होते. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी गेले होते. रत्नागिरी शहरातल्या मच्छी मार्केट परिसरातही पाणी साचले होते. रविवारी रात्री रत्नागिरी शहरातील तोरण नाल्याच्या पाण्याची दिशा बदलली आणि हे पाणी मुजावर कंपाउंडमधील घरांमध्ये शिरले. त्यामुळे मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ५ कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. त्यामुळे या कुटुंबीयांची झोप उडाली. याला सर्वस्वी रत्नागिरी नगर परिषद जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गटारे साफ न केल्याने उताराच्या दिशेने पाणी वळत असून मच्छिमार्केट, झारणी रोड परिसरातील घरांमध्ये हे पाणी शिरले आहे.
हेही वाचा - खारलँड विभागाचा भोंगळ कारभार; वरवडेत नागरिकांच्या घरात घुसले पाणी