रत्नागिरी - मराठी नववर्षानिमित्त आज देशभरात विविध पारंपारिक पद्धतीने नववर्ष साजरा करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही आज अनोख्या पद्धतीने गुढी उभारून गुढी पाडवा साजरा करण्यात आला. जनसेवा ग्रंथालयाच्या माध्यमातून साहित्याची गुढी उभारण्यात आली.
मराठी भाषा टिकावी, वाचक हा अधिक सजक व्हावा यासाठी ही साहित्यिक गुढी उभारण्यात आली आहे. ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारली जाते. त्याच पद्धतीने बांबूच्या काठीवरही साहित्याची गुढी उभारली गेली. मात्र यात फरक एवढाच आहे कि याला पुस्तकांचे, मासिकांचे तोरण बांधून गुढी उभारली गेली. मराठी साहित्याची चळवळ अधिक जोमाने उभी रहावी, मराठी साहित्याचा झेंडा अटकेपार अधिक जोमाने फडकावा, यासाठी ही गुढी उभारली गेली. या गुढीला देखिल ओवाळून मराठी साहित्याचे पुजन करुन गुढी उभी केली आहे. महाराष्ट्रातील ही एक आगळी वेगळी गुढी आहे.
साहित्यिक गुढी उभारण्याचे जनसेवा ग्रंथालयाचे हे दुसरे वर्ष आहे. साहित्यिक गुढी भोवती फुलांची रांगोळी आहे आणि मराठी भाषा किती समृद्ध आहे हे दाखवण्यासाठी मराठी नाटकाच्या ओळी आणि लेखकांची नावे या गुढीच्या पताकांमध्ये लिहण्यात आली आहेत. कोकणात कुठलाही सण म्हटला कि कोकणी गाऱहाण्याने त्या सणाची सुरुवात होते. मराठी भाषा टिकावी आणि मराठी साहित्य अधिक वृद्धीगत व्हावे यासाठी ही गुढी उभारताना कोकणी भाषेत सर्व भाषांना गाऱहाणे घातले गेले.