रत्नागिरी- तिवरे धरण दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाने सोमवारी धरणाची पाहणी केली. दरम्यान सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून वेळेत अहवाल सादर केला जाईल, असे या पथकाचे प्रमुख अविनाश सुर्वे यांनी सांगितले.
या पाहणीनंतर अविनाश सुर्वे म्हणाले की, घटनास्थळी येण्यापूर्वी समितीच्या सर्व सदस्यांची बैठक झाली. यावेळी वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली असून यात काही तांत्रिक बाबी आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करून ही दुर्घटना कशी घडली याचा सविस्तर अभ्यास केला जाईल. येथील ग्रामस्थांना 2 वर्षांपासून धरणामधून पाण्याचा विसर्ग होत असल्याचे दिसत होते. त्याचा नेमका धरणफुटीशी संदर्भ आहे का, हेही तपासले जाईल, असे सुर्वे म्हणाले.
एकूणच तांत्रिक आणि पाण्याची पातळी, वेगवेगळ्या वेळी आलेले अहवाल, धरणाच्या वेळचे बांधकाम, त्याची स्थिती आणि त्यावेळचे निरीक्षण टिपण हे जे काही उपलब्ध आहे, त्याचा अभ्यास करून काही निष्कर्ष समिती काढेल. याच्यासाठी भेटी होतील, बैठका होतील त्यानंतर राज्यशासनाला वेळेत अहवाल सादर केला जाईल, असे या पथकाचे प्रमुख अविनाश सुर्वे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.