रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस-मायनस व्हेरिएंटच्या विषाणूचे रुग्ण सापडलेले नाहीत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली आहे. आज झालेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये (SARS-CoV-२) डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आल्याची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये आली होती. तसेच, डेल्टा प्लसचे सातपैकी पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. असेही बातमीत म्हणण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
तर राज्याची आरोग्य यंत्रणा माहिती देईल
डेल्टा-प्लस किंवा मायनस व्हेरिएंटचे एकही रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आलेला नाही. याबाबद काही काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. जिल्ह्यात डेल्टा प्लस या नवीन कोरोना विषाणूचे रुग्ण सापडल्याच्या बातमीचे जिल्हाधिकाऱ्यांकडून खंडन करण्यात आले आहे. संगमेश्वरमध्ये वेगळा विषाणू आहे का? याची तपासणी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच, खबरदारी उपाय म्हणून संगमेश्वर बाजारपेठ आणि आजाबाजूच्या गावे कंन्टेटमेंट झोन करण्यात आली आहेत. दरम्यान, जर नवीन विषाणूचा व्हेरिएंट सापडला असेल, तर राज्याची आरोग्य यंत्रणा माहिती देईल. लोकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे.