रत्नागिरी - महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही जीआर किंवा अध्यादेश काढलेला नाही. मात्र, येत्या दोन दिवसात राज्यातील महाविद्यालय सुरू होण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रत्नागिरीत दिली आहे.
पुण्यात काही ठिकाणी स्वायत्त कॉलेज सुरू झाल्याची बातमी कानावर येत आहे. मी स्वतः सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो आहे. माझ्या विभागातील संचालकांशी बोललो आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही जीआर किंवा अध्यादेश काढलेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार बुधवार किंवा गुरूवारी या दोन दिवसांच्या आत कॉलेज सुरू करण्याबाबत तारीख जाहीर केली जाईल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
शाळा 4 ऑक्टोंबरपासून झाल्या सुरू
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारकडून चार ऑक्टोंबर रोजी शाळा उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शाळेची घंटा वाजली. बहुतांश ग्रामीण भागातील शाळांकडून कोरोनाची नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज होती.
हेही वाचा - समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्याचे आदेश नाहीत, गृहमंत्र्यांचा खुलासा