रत्नागिरी - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. त्यासाठी १० नोव्हेंबर हा दिवस निश्चित करण्यात आलाय. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा लिलाव व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे होणार आहे. दाऊदचे मूळ गाव असलेल्या मुंबके येथील इच्छुक गरजू शेतकऱ्यांना यासाठी प्राधान्य देण्यात यावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दाऊदचे बालपण मुंबके या गावात गेलं. त्याने या आलिशान बंगला बांधला होता. तसेच त्याला काही अन्य मालमत्ता देखील आहेत. या मालमत्ता त्याची आई व बहिण यांच्या नावावर आहेत. या सर्व मालमत्ता सरकारने जप्त केल्या आहेत. दाऊदच्या या मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. सरकारकडून त्या संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबके गावात दाऊद इब्राहिमचा 4 हजार चौरस फूटांचा बंगला आहे. या ठिकाणी तीन जमिनी आहेत. तसेच लोटेमध्येही जागा आहे. या प्रॉपर्टीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा लिलाल १० नोव्हेंबरला आॉनलाइन पद्धतीने होणार आहे.
लिलावात स्थानिक गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावं
शासनाने नियमानुसार स्थानिक गरजू शेतकऱ्यांना ही जमीन द्यावी, अशी मागणी गावात जोर धरू लागली आहे. याबाबत बोलताना गावचे माजी सरपंच अकबर दुदुके म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो जगला पाहिजे. या गावातील एखादा शेतकरी इच्छुक असेल, तर शासनाने पहिलं प्राधान्य गावातील शेतकऱ्यांना द्यावं, अशी विनंती असल्याचं दुदुके म्हणाले.
गावातील जमीन कसतात दाऊदचे काका
दाऊदची गावातील वडिलोपार्जित जमीन दाऊदचे काका इस्माईल कासकर कसत आहेत. दाऊदची आई अमिना कासकर ही इस्माईल कासकर यांची वहिनी. तिनेच ही जमीन इस्माईल कासकर यांना कसायला सांगितली होती. याबाबत बोलताना इस्माईल कासकर म्हणाले की, गेली 20 वर्ष ही जमीन मी कसत आहे. त्यावर खर्च करतोय, साफसफाई करतोय. या जमिनीचा लिलाव होणार आहे, असं मी ऐकलं आहे. जे कायद्यात आहे ते सरकारने करावं, माझं काहीही म्हणणं नाही. ही जमीन माझ्या वहिनीच्या नावाने म्हणजेच हमीदाच्या नावाने आहे, असे ते म्हणाले.
लिलावाकडे सर्वांचं लक्ष
दाऊदच्या मुंबकेमधील मालमत्तेचा दोन वेळा लिलाव जाहीर झाला होता. परंतु खरेदीसाठी कोणीही पुढे आले नाही. आता तिस-यांदा लिलाव होणार आहे. मुंबके गावातील प्रॉपर्टी दाऊदची आई अमिना कासकरच्या नावे आहे. दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव हा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय असतोच. त्यामुळे दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीचा लिलाव कोण घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.