रत्नागिरी - जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका दापोली, मंडणगडमध्ये बसला आहे. दापोलीत ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे कोसळली आहेत. तर बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, नारळ, पोफळी आणि फणसाची हजारो झाडे या वादळात भुईसपाट झाली आहेत.
दापोली तालुक्यातील जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदार शेतकऱ्याचंही मोठे नुकसान झाले आहे. बर्वे यांची जवळपास 500 पोफळीची झाडे, 20 आंबा कलमे, नारळ 15 ते 20, फणसाची 25 ते 30 झाडे उन्मळून पडली आहेत. आंब्याची झाडे तर 50 ते 60 वर्षांची होती.
याबाबत माहिती देताना शेतकरी नरेंद्र बर्वे म्हणाले, 'निसर्ग वादळात झालेले नुकसान न भरून निघणारे आहे. पुढील पाच वर्ष आम्ही यातून सावरणार नाही. दहा वर्षांपूर्वीच्या आलेल्या फयान वादळा पेक्षाही निसर्ग वादळाने मोठे नुकसान केले. स्वतःच्या जीवपेक्षा या झाडांना जपले होते, पण या वादळात ती डोळ्यासमोर पडताना मनाला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात सांगू शकत नाही.'
दापोलीत अनेक घरांवर झाडे कोसळून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने बुधवारी दुपारी आलिबागजवळ धडकले. कोकणासह मुंबई, ठाण्याला वादळाचा तडाखा बसला. पण यात सर्वाधिक नुकसान रायगड जिल्ह्यात झाले. अलिबाग तालुक्यात विजेचा खांब कोसळल्याने एकाचा, तर श्रीवर्धन तालुक्यात वृक्ष पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जखमी झालेल्या पक्षांना स्थानिकांनी दिले जीवदान
हेही वाचा - रत्नागिरी : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्वतः उतरले मदतकार्यात !