रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहे. राजापूर तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने आंबोलगड येथील 68 कुटुंबातील 254 व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.
झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
मुसाकाझी येथील 2 कुटुंबातील लोकांचेही स्थलांतर केले आहे. तर आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. नाटे आणि परिसरात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे. शिवाय, पाऊसही सुरू झाला आहे. या वादळचा पुढे सरकण्याचा वेग 7 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. दरम्यान, रत्नागिरीतही जोरदार वादळी वारे वाहत आहे. पाऊसही पडायला सुरुवात झाली आहे.
वादळाचा वेग तासाला 13 किलोमीटर
'तौक्ते' चक्रीवादळ पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पणजीपासून समुद्रात 130 किलोमीटर अंतरावर दाखल झाले. यावेळी या वादळाचा वेग तासाला 13 किलोमीटर असा होता, अशी माहिती हवामान विभागाने सकाळी जाहीर केलेल्या बुलेटिनमधून दिली आहे. हे वादळ आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र हद्दीमध्ये सरकले आहे. यामुळे गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. किनारी भागांमध्ये जोरदार वारे वाहत आहे. तर गोवा आणि सिंधुदुर्गात विजेचा लपंडाव सुरू आहे. चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आले आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी कोळंब काणकोण भागामध्ये रहिवासी क्षेत्रात समुद्राचे पाणी घुसले आहे. या भागातील रस्तेदेखील समुद्राच्या लाटांनी उद्ध्वस्त झाले आहेत. गोव्यात एनडीआरएफच्या पथकासह अन्य सुरक्षा एजन्सीची पथके तैनात करण्यात आली आहेत.
हेही वाचा - तोक्ते चक्रीवादळ : रत्नागिरीतील पाच तालुक्यांत पूर्णपणे संचारबंदी