रत्नागिरी- देशभरात एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच दुसरीकडे 'बर्ड फ्लू'चे संकट उद्भवले घातले आहे. दरम्यान दापोलीत डम्पिंग ग्राउंडजवळ सहा कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या कावळ्यांंचा मृत्यू कचऱ्यातील विषारी घटकांमुळे झाल्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागाने वर्तवला आहे.
दापोलीत कावळे आढळले मृतावस्थेत, 'बर्ड फ्लू'च्या भितीमुळे परिसरात खळबळ मृत कावळे तपासणीसाठी भोपाळ प्रयोगशाळेतदापोली नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात अचानकपणे पाच कावळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळून आले. तसेच नगरपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ आणखी एक कावळा मृतावस्थेत आढळला होता. याची माहिती नगरपंचायतीचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कावळे मृत पावलेल्या ठिकाणी धाव घेऊन या कावळ्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. या मृत कावळ्यांचे नमुने घेऊन हे सर्व मृत कावळे पुढील तपासाकरीता पुणे येथून भोपाळ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
कावळ्यांचा मृत्यू कचऱ्यातील विषारी घटकांमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाजमात्र, या कावळ्यांचा मृत्यू कचऱ्यातील विषारी घटकांमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. कचऱ्यात अनेक दिवस अन्न पदार्थांसह अन्य वस्तू कायम राहिल्यास त्याच्यात नैसर्गिकरित्या विष तयार होते. हे विष खाल्ल्यानेच सहा कावळ्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने वर्तविली आहे . पुणे प्रयोगशाळेमार्फत भोपाळ लॅबोरेटरीत सर्व मृत कावळे पशुसंवर्धन विभागाने पाठविले आहेत . पुढील आठवड्यात कावळ्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त होणार आहे .
जनतेने घाबरून न जाण्याचं आवाहनस्थलांतरीत पक्षांमुळे बर्ड फ्ल्युचा प्रादुर्भाव होत असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. बर्ड फ्लुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र शासनाने नवी दिल्लीत मध्यवर्ती कक्षाची स्थापना केली आहे . केंद्रीय आरोग्य विभागाचा मध्यवर्ती कक्ष देशातील प्रत्येक राज्याच्या संपर्कात राहून बर्ड फ्ल्युच्या प्रादुर्भावाबाबतची माहिती संकलित करणार आहे . महाराष्ट्रात अद्यापही बर्ड फ्ल्युचा प्रादुर्भाव सुरू झालेला नाही, दापोली डंम्पिग ग्राऊंडवर मृतावस्थेत सापडलेले सहा कावळे स्थानिकच होते . स्थलांतरीत पक्षाचा मृत्यु झाला तरच बर्ड फ्ल्युच्या प्रादुर्भावाबाबतची शक्यता वर्तविली जात आहे. स्थलांतरीत पक्षी मृतावस्थेत सापडल्यास जनतेने नजिकच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, तसेच लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मुकुंद लोंढे यांनी केलं आहे.