रत्नागिरी - आज मध्यरात्रीपासून 9 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी आज एकच गर्दी केली होती. मात्र, दूध, भाजीपाला, कांदा, किराणा खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, जनतेला अवधी मिळावा यासाठी हा कडक लॉकडाऊन गुरुवारपासून असणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार सकाळी 7 ते 11 वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी असल्याने ग्राहकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती.
निर्बंध कडक होणार असल्याने गर्दी -
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. 3 जून पासून म्हणजेच आज मध्यरात्रीपासून कडक अंमलबजावणी होणार आहे. यापूर्वी पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार 2 जून पासून हा कडक लॉकडाऊन सुरू होणार होता. मात्र, नागरिकांना 48 तास आधी कल्पना द्यावी व त्यांना किराणा व अन्य अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी संधी मिळावी म्हणून गुरुवार 3 जूनपासून कडक लॉकडाऊन होणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी संध्याकाळी स्पष्ट केले.
हे राहणार सुरू -
लॉकडाऊनमध्ये मेडीकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा, व आरोग्य विषयक आस्थापना पूर्णवेळ सुरू राहतील. तथापि, सदर आस्थापना मधून खाद्यपदार्थ, किराणा माल, वैद्यकीय नसलेले साहित्य विक्री करण्यास परवानगी असणार नाही. याव्यतिरिक्त किराणा मालाच्या दुकानासह सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना पूर्णत: बंद राहतील. केवळ दूध विक्री घरपोच सेवा सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत करता येईल.
खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा -
नागरिकांनी खरेदीसाठी बाजारांत गर्दी केल्याचे चित्रे होते. किराणा दुकानदारांसमोर खरेदीसाठी ग्राहक रांगेत उभे होते. मटण, चिकन विक्रेत्यांकडेही रांगा लागल्या होत्या. आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला, फळे नागरिक खरेदी करताना दिसत होते. सकाळी दुधासाठी विशेष मागणी होती. अनेक ग्राहकांनी जास्त दूध, दही खरेदी केले. त्यामुळे पहिल्या 2 तासांतच अनेक ठिकाणी दूध संपल्याचे चित्र होते.