रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर आज नागरिकांनी गर्दी केल्यामुळे गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळाचे रुपांतर वादात झाल्याने अखेर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांची समजूत काढली.
लस मिळाली नसल्याने नागरिक नाराज
सध्या ऑनलाईन पद्धतीने लस मिळत नसल्याने, नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. दरम्यान आज मिस्त्री हायस्कूल येथील केंद्रावर सकाळी १८ ते ४४ वर्षांकरता ऑनलाईन पध्दतीने बुकिंग झालेल्यांना लस देण्याचा कार्यक्रम सुरू होता. याच केंद्रावर दुपारनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार होता. दुसरी लस घेणाऱ्या नागरिकांनी देखील केंद्रावर सकाळी पाचपासूनच रांग लावली होती. त्यामुळे लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. सकाळी ज्या नागरिकांचे लसीकरण आहे त्यांच्यामध्ये आणि 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी आलेल्या नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, दुपारच्या सत्रात ज्यांचे लसीकरण आहे, त्यांना दुपारून येण्यास सांगितले. मात्र यावर नाराजी व्यक्त करत, रांगेत उभे राहून सुद्धा लस मिळत नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे.
हेही वाचा - दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात टँकर मधून ऑक्सिजन गळती; जीवितहानी नाही