रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले असले, तरी बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रुग्णांना उपचार देण्यात अडथळा येऊ नये, यासाठी आता शहरातील उद्यमनगर येथील महिला रुग्णालयात 100 खाटांचे कोविड सेंटर येत्या मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी नवीन कर्मचारी भरतीदेखील सुरु झाल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
खाजगी डॉक्टरांचे सहकार्य देखील घेण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. ते शनिवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलत होते.
रिफायनरी प्रकल्प नाणार येथे करणार की नाही, याचा निर्णय दोन महिन्यात घ्या, असा अल्टीमेटम केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला आहे. याबाबत राज्य सरकारमधील मंत्री म्हणून सरकारची काय भूमिका आहे, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले की, राजापूर तालुक्यात नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच पूर्णविराम दिला आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले असून ते कोकणात आपल्या गावी आले आहेत. त्यांना रोजगार देण्याबाबत प्रयत्न केले जातील, असेही सामंत म्हणाले.