रत्नागिरी - दुबईहून परतलेल्या चिपळूणमधील एका 37 वर्षीय व्यक्तिला कॉरेंटाईनचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, कॉरेंटाईन राहण्याऐवजी तो व्यक्ती फरार झाला. या फरार झालेला कोरोना संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्याला पुन्हा घरातच कॉरेंटाईन ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा व्यक्ती दुबईहून आल्यानंतर 19 मार्चला त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याला पुढील 14 दिवस घरातच राहण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, तो घरी न जाता दवाखान्यातून पसार झाला.
हेही वाचा - भारतात कोरोनाचे २५८ रुग्ण; मृतांचा आकडा ५ वर
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संतोष हंकारे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर या संशयिताविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी या व्यक्तीला शोधून काढले असून त्याला त्याच्याच घरात कॉरेंटाईन ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २५८ वर गेली आहे. यामध्ये ३८परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा राज्यात सर्वात जास्त म्हणजे १४ परदेशी नागरिकांना आणि तेलंगाणात ९ जणांना लागण झाली आहे. आज(शनिवारी) राजस्थानात ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.