रत्नागिरी- दरवर्षी गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू झालेले असले तरी ग्राहकांकडे पैसे नसल्यामुळे ऐन गणेशोत्सवात स्थानिक बाजारपेठांवर आर्थिक उलाढालीचा परिणाम दिसून येत आहे.
गणेशोत्सव सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्राहक बाजारपेठेत दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुकानदारांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. बाजारपेठा विविध साहित्याने सजलेल्या आहेत. अनेका दुकानदारांनी नवीन माल भरला आहे. मात्र, बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत नाही.
दरवर्षी गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी चार दिवस अगोदर बाजारपेठा गर्दीने हाऊसफुल्ल झालेल्या असतात. याकाळात बाजारपेठांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र, यावेळेस तसे चित्र दिसून येत नाही. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे गर्दी पाहायला मिळत नाही.दुकानदारांनी गणेशोत्सवासाठी साहित्य खरेदी केली आहे ते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. ग्राहकच नसल्याने बाजारपेठांमध्ये म्हणावी तशी मोठी उलाढाल दिसून येत नाही. गेले चार महिने लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही, काम नसल्याने हातात पैसा नाही. आता लॉकडाऊन उठल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू झाले. मात्र, ग्राहकांच्या हातातच पैसा नसल्यामुळे स्थानिक बाजारपेठांवर आर्थिक उलाढालीचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या साडेचार महिन्यात आर्थिक मंदीला तोंड देणाऱ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.