चिपळूण (रत्नागिरी)- यावर्षी कोरोनामुळे ढोलकीच्या थापेवर कोरोनाचा चाप बसला आहे. त्यामुळे चिपळूणमधील ढोलकी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. चिपळूण येथील मनोज वरवडेकर यांचे पान गल्लीत ढोलकी तबल्याचे दुकान आहे. पिढीजात चालत आलेला त्यांचा हा व्यवसाय आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ढोलकी व्यवसायिक वरवडेकर आर्थिक संकटात सापडले आहेत.
गणपती सण हा कोकणामध्ये व महाराष्ट्रमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, कोरोनामुळे यावेळी गणपती उत्सव साधेपणाने करावा असे शासनाने सांगितले आहे. त्यामुळे ढोलकीचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कोकणात जाकडी नृत्यासाठी ढोलकीचा वापर होतो. मात्र, आता नृत्यूच होणार नसल्याने ढोलकीही वाजणार नाही.
कोरोनामुळे आधी 3 ते 4 महिने दुकान बंद होते. आता गणपती सण आला तरी कोरोना संपत नसल्याने हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक वस्तू वगळता इतर वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ढोलकीच्या व्यवसायावर संक्रात आली आहे. जुनी ढोलकी दुरुस्तीसाठीही अगदी तुरळक ग्राहक येत असल्याचे वरवडेकर यांनी सांगितले.