रत्नागिरी - गेले काही दिवस जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या लवकरच शंभरवर पोहोचण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री आणखी सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 92 वर पोहोचली आहे.
रविवारी रात्री एकूण 270 अहवाल मिरज येथून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी 264 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर, सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कळंबणी येथील एक व दापोली येथील पाच असे 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालातील एक रुग्ण मुरडव(खेड), चार रुग्ण कोंडये शिगवण - वाडी (दापोली), तर एक कोळथरे (दापोली), या गावातील आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 92 झाला आहे.
जिल्ह्यात 1 मे पर्यंत अवघे 6 रुग्ण होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तर 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली होती. त्यानंतर 2 मे पासून मात्र, रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला लागली आणि गेल्या 16 दिवसात तब्बल 86 रुग्ण नव्याने सापडले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील नर्सिंगच्या 6 विद्यार्थिनी वगळता बाकी सर्व रुग्णांची मुंबई प्रवासाची हिस्ट्री आहे.
मुंबईतून जसजसे चाकरमानी जिल्ह्यात दाखल होऊ लागले तसतशी रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 92 वर पोहचली असून रत्नागिरी जिल्हा आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. हा आकडा केव्हाही पार होऊ शकतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.