रत्नागिरी - केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात आज चिपळूणमध्ये काँग्रेसकडून उपोषण करण्यात आले. चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव तसेच काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचेचे स्थानिक नेते रमेश कदम तसेच राष्ट्रवादीचे तालुका जयंद्रथ खताते हेही उपस्थित होते.
केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला. काँग्रेसनेही त्याला पाठिंबा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी काँग्रेसकडून उपोषण करून याला पाठिंबा देण्यात आला. दरम्यान चिपळूण तालुक्यातही काँग्रेसकडून उपोषण करण्यात आले. शेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात हे उपोषण करण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा काँग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
'हे कायदे मागे घ्यावेच लागतील'
यावेळी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक करून मते मागितली. आताचे हे काळे कायदे हुकूमशाह मोदी यांना मागे घ्यावेच लागतील, जनता मोदींना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली.
'शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे केंद्र सरकार'
दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचा आवाज केंद्र सरकार सर्व बाजूंनी दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व जनतेला कळावे, शेतकऱ्यांच्या पाठीमागे शक्ती उभी राहावी, म्हणून हे आंदोलन काँग्रेसकडून गावागावांत, घराघरांत पोहोचविण्यासाठी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून हे उपोषण करण्यात येत असल्याचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी यावेळी सांगितले.