रत्नागिरी - कोरोना पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार करणार्या एका महिला डॉक्टरलाही कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्याचा संशय आहे. तिचे स्वॅप नमुने पाठवण्यावरुन व रुग्णालयात दाखल करण्यावरुन जिल्हा शल्यचिकित्सक व महिला डॉक्टरमध्ये जोरदार वादावादी झाली. यातून परस्पर विरोधी तक्रार पोलीस स्थानकात देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा संशय असूनही समाजात वावरल्याने या महिला डॉक्टर विरोधात साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील रुग्णाला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅप नुमने घेण्याचे काम या महिला डॉक्टरने केले होते. शृंगारतळी येथील रुग्णाचे नमुने पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्यावर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, २ दिवसापासून या महिला डॉक्टरची प्रकृती बिघडली होती. या महिला डॉक्टरने याची कल्पना वरिष्ठांनाही दिली. त्यानंतर महिला डॉक्टरचे स्वॅप नमुने घेण्यात आले. मात्र, त्या अॅडमिट न झाल्याने त्यांचे स्वॅप नमुने पाठवण्यात आले नाही. त्यावरुन महिला डॉक्टर व जिल्हा शल्यचिकित्सकांमध्ये वाद झाला. यावेळी कॉरन्टाईन होण्यास महिला डॉक्टरांनी नकार दिला व त्या घरी निघून गेल्या. त्यानंतर स्वॅप नमूने पाठवले नाहीत, म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकार्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
याबाबत महिला डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधत लेखी तक्रार दिली. त्याचप्रमाणे कॉरन्टाईन होण्यास नकार देऊन समाजाला बाधा होईल, असे कृत्य केल्याबाबत आरोग्य यंत्रणेने महिला डॉक्टर विरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भा.दं.वि.क. 269, 270, 188 सह साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या महिला डॉक्टरला पोलीस बंदोबस्तात एमआयडीसी रेस्टहाऊस येथे कॉरन्टाईल करण्यात आले आहे. त्याचे स्वॅप नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादीही तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर वैद्यकीय पथकाची नजर आहे.