लांजा - रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पावरून वातावरण तापलं आहे. नागरिकांचा तीव्र विरोध असलेला हा प्रकल्प जोरजबरदस्तीने व राजकीय बळाचा वापर करून लादणार असाल तर तो प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक
लांजा नगरपंचायत सध्या चर्चेत आली आहे ती येथील घनकचरा प्रकल्पाला असलेल्या स्थनिकांच्या विरोधामुळे. लांजा नगरपंचायत 10 एकरात घनकचरा प्रकल्प राबवत आहे. मात्र, या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी नगरपंचायत, प्रांताधिकारी, रत्नागिरी जिल्हाधिकारी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाने लोकांचा विरोध लक्षात घेऊन त्यांची बाजू समजून घेण्याऐवजी प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कोत्रेवाडीतील या प्रकल्पासाठीच्या 10 एकर जागेला लांजा नगरपंचायतीने ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र, या जागेच्या बाजूला लागून असलेल्या गट नंबर 1862 जमिनीमध्ये सार्वजनिक विहीर आहे. या जागेची मालकी जिल्हा परिषदेची आहे. तसेच या परिसरात दोन सार्वजनिक विहीरी आहेत. हा प्रकल्प येथे झाला तर या विहिरीचं पाणी दुषित होईल. त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल, अशी भीती येथील नागरिकांना आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.
सत्ताधारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवकही प्रकल्पाविरोधात आक्रमक
'मुळात कोत्रेवाडीतला हा डंपिंग ग्राउंडचा प्रकल्प जिल्हास्तरीय कमिटीने पहिल्यांदा नाकारला होता. मात्र, नगरपंचायतीने आयत्या वेळीच्या ठरावात हा प्रकल्प बेकायदेशीरपणे मंजूर करून घेतला', असा थेट आरोप शिवसेना नगरसेवक प्रसाद डोर्ले यांनी केला आहे. त्यामुळे एकदा नाकारलेल्या प्रकल्पाला पुन्हा मान्यता कशी दिली गेली? असा सवालही प्रसाद डोर्ले यांनी केला आहे. लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, ज्या शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात हा प्रकल्प होत आहे, त्या प्रभागातील शिवसेनेचेच नगरसेवक प्रसाद डोर्ले यांनाही याबाबतीत विश्वासात घेण्यात आलेले नाही. 'एकीकडे तालुक्यात कोरोनाची परिस्थिती भयावह असताना डंपिंग ग्राउंड हाच तालुक्याचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने प्रशासन वावरत आहे. तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, प्रशासनाचा एककल्ली कारभार आहे. अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत प्रशासन जर हा प्रकल्प जबरदस्तीने रेटणार असेल तर येथील नागरीक गप्प बसणार नाहीत. आपणही त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे आहे', असे प्रसाद डोर्ले यांनी म्हटले आहे.
'नगरपंचायत स्थानिकांच्या शंकांचं निरसन करेल'
'जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनेच हा प्रस्ताव आपल्याकडे आला आहे. त्याची प्रशासकीय बाब आता सुरू आहे. यामध्ये महसूल प्रशासनाची भूमिका खूप कमी आहे. तसेच नगरपंचायत स्थानिकांच्या शंकांचं निरसन करेल', असे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी म्हटले आहे. यातून त्यांनी एकप्रकारे जबाबदारी नगरपंचायतीवर टाकल्याचे दिसत आहे.
विरोधानंतरही प्रकल्प रेटला जात असल्याने संशयाला बळ
लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. राजापूर लांजा विधासभेचे आमदारदेखील शिवसेनेचेच आहेत. असे असतानाही ज्या ठिकाणी हा प्रकल्प होतोय, तेथील शिवसेनेच्या नगरसेवकालाही विश्वासात घेण्यात आलेले नाही. स्थानिकांच्या पाठीशी हे नगरसेवक ठामपणे उभे आहेत. एकूणच सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती, त्यात या प्रकल्पाला असलेल्या स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतरही हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड असल्याची चर्चा सध्या लांजा तालुक्यात सुरू आहे.
हेही वाचा - 'फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करा'