रत्नागिरी - एकीकडे मराठी राजभाषा दिन साजरा होत आहे, तर दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या दरवर्षी घटताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्या टिकवण्याचे मोठे आव्हान शासनासमोर उभे आहे. तर काही प्राथमिक शाळा मात्र विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
वाढते शहरीकरण व झपाट्याने होत असलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे खासगी शाळांचे पेव वाढले आहे. आज शहरासह ग्रामीण भागातही या शाळांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळेच आपल्या पाल्याला खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालण्याचा पालकांचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्या झपाट्याने खाली येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी सन २०१८-१९ मध्ये झालेल्या पटनोंदणीत जि.प.च्या प्राथमिक शाळांची पटसंख्या ७८ हजार १९६ इतकी आहे. गतवर्षी २०१७-१८ मध्ये ही पटसंख्या ८२ हजार ८२६ इतकी होती. त्यामध्ये ४ हजार ६०३ ने घट झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही अशीच घट होत आहे. त्यामुळेच वाढत्या शैक्षणिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी शासनस्तरावरून जि. प. शाळांची गुणवत्ता वाढीसाठी आमुलाग्र बदल केले जात आहेत. त्यासाठी मुल्यांकनही केले जाऊ लागले आहे. मात्र तरीही प्राथमिक शाळांमधील घसरती विद्यार्थी पटसंख्या रोखण्याचे शिक्षण विभागासमोर एक आव्हान आहे.
सन २०१८-१९ साठी सुरू झालेल्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभालाच इ. १ ली ते ८ वीच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील पटसंख्येची नोंदणी शिक्षण विभागस्तरावरून करण्यात आली होती. त्यावेळी इ. १ ली ते ५ वी मधील विद्यार्थी पटसंख्या ५९ हजार ७९० तर इ. ६ ते ८ वी मधील प्राथमिक शाळांची पटसंख्या १८ हजार ४०६ इतकी नोंद करण्यात आली आहे. सन २०१७-1१८8 च्या शैक्षणिक वर्षात असलेली पटसंख्या नोंदणी पाहता त्यावेळी इ. १ ली ते ५ वीच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या ६२ हजार ५५४ तर उच्च पाथमिक इ. ६ वी ते ८ वी मधील पाथमिक शाळांची पटसंख्या २० हजार ७९६ इतकी नोंद करण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी देवीदास कुलाल म्हणाले, जिल्हा परिषदेच्या एकूण सुमारे २ हजार ६८८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मागील शैक्षणिक वर्षी ६१० शाळांतील पटसंख्या १ ते १० इतकी असल्याचे सांगण्यात येते. मात्र असे असले तरी काही प्राथमिक शाळांमधील शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं. १ ही शाळा त्यापैकीच एक या शाळेची पटसंख्या आजही १२५ च्या घरात आहे.
अनुप्रिता आठले म्हणाले, २०१४-१५ या मधील शैक्षणिक वर्षात २ हजार ७३३ शाळांत पटनोंदणीत विद्यार्थी संख्या १ लाख ७ हजार ५११ इतकी होती. सन २०१५-१६ मध्ये झालेल्या २ हजार ७३३ शाळां पटनोंदणीत विद्यार्थी संख्या ९८ हजार ८९३ इतकी होती. सन २०१६-१७ मध्ये २ हजार ७१९ प्राथमिक शाळांमध्ये पटसंख्येची आकडेवारी ९० हजार १५३ इतकी होती. वर्षागणिक घटणारी शाळांची पटसंख्या जि.प. प्राथमिक शाळांच्या अस्थित्वावर पश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे..
सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची पटसंख्या तालुकानिहाय पुढीलपमाणे
मंडणगड प्राथमिक २ हजार ९७२ तर उच्च प्राथमिक ८८५, दापोली प्राथमिक ६ हजार ४५७ उच्च प्राथमिक २ हजार २५, खेड प्राथमिक ६ हजार २७२ उच्च प्राथमिक एक हजार ८९५, गुहागर प्राथमिक ५११३ उच्च प्राथमिक एक हजार ८६२, चिपळूण प्राथमिक ८ हजार १९७ उच्च प्राथमिक २ हजार ७११, संगमेश्वर प्राथमिक ७ हजार ९२६, उच्च प्राथमिक २ हजार ३२३, रत्नागिरी प्राथमिक ९ हजार ५९६ उच्च प्राथमिक २ हजरा ४०६, लांजा प्राथमिक ५ हजार २१८ उच्च प्राथमिक २ हजार ४७, राजापूर प्राथमिक ७ हजार ५१२ तर उच्च प्राथमिक २ हजार २५३