रत्नागिरी- जिल्ह्यातील दोन ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्याच्या तक्रार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या दोन्ही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन अहवाल सादर करण्याची कार्यवाही ७ दिवसात करावी, असे पत्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे. या संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी लेखी स्वरुपात पत्र दिले होते.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांना दिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी चव्हाण यांनी चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल आणि संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील पूल, यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात यंदा पर्जन्यवृष्टीमुळे सर्व नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे दोन वेळा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे पुलांची सुरक्षित्ता निश्चित करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही ब्रिटीशकालीन पूलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र पाठविले आहे.