रत्नागिरी - खेड तालुक्यातील खेड - धामणंद मार्गावरील खोपी घाटातील काळकाईकोंड खिंड येथे क्वॉलीस कार दरीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य १२ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. ५) सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडला.
खोपी येथे खासगी कामासाठी क्वॉलीस कारमधून १३ जण आले होते. हे सर्व जण काम आटपून खोपीवरून कासईला परत निघाले असता. खोपी घाटात त्यांच्या कारला अपघात झाला. अपघातात कारमधील छाया सुरेश शिंदे (वय ५०, रा. कुळवंडी) यांचा मृत्यू झाला, तर अन्य १२ जण जखमी झाले.
जखमींमध्ये सविता राजू जानकर (३५), विठ्ठल बाबाजी जानकर(६०), सुनिल बाबाजी जानकर (३५), राजू बाबाजी जानकर (४०), दर्शन राजाराम जानकर (१२), सर्व रा. कासे, राजेंद्र रामचंद्र गोरे(४०), राजाराम गोरे(३५, दोघे रा.निर्ले), प्रकाश बाळू केंडे(४५), विजय लक्ष्मण केंडे(३४, दोघे रा. तुळशी),सुनिता संतोष शिंदे(३०, कुळवंडी), संतोष जानकर(४०), बेबीबाई बाबू जानकर (४५, दोघे. रा. सनघर) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक दीपक उत्तकेर, गजानन पालांडे, संदीप शिरावले आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. रात्री उशीरापर्यंत मदतकार्य सुरू होते.