रत्नागिरी - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफीच्या चौकशीची चर्चा होत आहे. म्हणून 'दूध का दूध और पानी का पानी' होऊन जाईल, असे म्हणत या कर्जमाफीची चौकशी करण्यात यावी, असे प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना लाड म्हणाले, चौकशी करणार ही गोष्टच हास्यास्पद आहे. ज्या सरकारमध्ये शिवसेना घटकपक्ष होती. त्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये मान्य झालेली ही कर्जमाफी आहे आणि आज त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री म्हणत असतील की आम्ही चौकशी करणार, तर त्यांनी ती खुशाल करावी. देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा पारदर्शक कारभार आणि स्वच्छ प्रतिमा असलेला मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला मिळाला नव्हता. त्यामुळे असे बोलणाऱ्यांची आपल्याला कीव येत असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी ही चौकशी करावी आणि 'दूध का दूध और पानी का पानी' होऊन जाऊ दे, असे आवाहन लाड यांनी सरकारला केले आहे.
हेही वाचा - वाईट नेत्याला साथ देणं महाराष्ट्राची चूक, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी आज (रविवारी) पुन्हा केलेल्या ट्विटचे लाड यांनी समर्थन केले. जर अमृता फडणवीस यांनी एक महाराष्ट्राची एक सामान्य नागरिक म्हणून हे ट्विट केले असेल तर ते सत्य आहे. महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, असे त्यांनी योग्यच लिहिले आहे. 'जागो महाराष्ट्र'च्या माध्यमातून महाराष्ट्राला जागृत करण्याचे जे काम त्यांनी केले त्याला आमचे 100 टक्के समर्थन आहे, असेही ते म्हणाले.