मुंबई - हे सरकार निकम्मं असून सर्वसामान्यांच्या आयुष्यात एकही बदल या सरकारच्या काळा घडला नाहीय, असा आरोप भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा पायगुण असा, की ते आले आणि कोरोना आला, असे राणे म्हणाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू, अॅड बाबासाहेब परुळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे वर्ष
महाविकास आघाडी सरकारचं हे वर्ष महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं ठरलंय. महाराष्ट्र राज्य 10 वर्षे मागे गेलं आहे. सामनाच्या मुलाखतीत काय केलं याचा उल्लेख नाही. यांच्या हातून काम होईल असं वाटत नाही, मी त्यांना ३९ वर्ष पाहिलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी इतर पक्षांचा त्यात स्वार्थ असू शकतो, अशी टीका राणे यांनी केली.
...म्हणून सत्तेवर आल्यानंतर अनेक संकटे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासनातील अनुभवच नसल्याचे आज राज्यातील गरीब, कष्टकरी, मजूर, उद्योजक, व्यावसायिक, अनाथ, महिला यांच्यावर अन्याय होत आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्वाधिक बळी महाराष्ट्रात गेले. पोलीस फक्त आमच्या कुटुंबासाठीच आहेत, असे ठाकरे राबवत आहेत. त्यामुळे बाहेर कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. सुडाचे राजकारण, खोट्या केसेस आणि भ्रष्टाचार बोकाळला असून त्याचे प्रतिबिंब रत्नागिरीतही दिसत असल्याचे प्रतिपादन नारायण राणे यांनी केले.
वाईट पायगुण घेऊन आलेल्या या ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक संकटे आली. कोरोनामध्ये सर्वाधिक बळी महाराष्ट्रात गेले. या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, उपचार, औषधे, सर्व्हे यावर काम झाले नाही. कोरोनासाठी १२ हजार कोटी खर्च केल्याचे सांगितले. पण त्यातील ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राणे यांनी केला.
कायदा आणि सुव्यवस्था ढासळली
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. पोलीस यंत्रणेचा स्वतःच्या कुटुंबासाठी वापर केला जात आहे. धर्माचे रक्षण केले जात नाही. शिक्षणाबाबत कोणतेही धोरण नाही. मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात एकवाक्यता नाही. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांचा खून झाला आहे. मात्र ते प्रकरण दाबले जात आहे. सुडाचे राजकारण करून खोटे खटले दाखल करून अटक सत्र सुरू केले आहे. हे पहिलेच मुख्यमंत्री असतील ज्यांच्या राज्यात पत्रकारांवर कारवाई केली जातेय. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई हे त्याचे उदाहरण असून अन्वय नाईक प्रकरण नव्याने तपासण्याची मागणी राणे यांनी केली आहे.